ताज्या घडामोडी

महावितरणच्या कार्यालयातच ग्रामस्थांचा आत्मदहनाचा प्रयत्न,

कोल्हापूर : आतापर्यंत कृषीपंपाच्या विद्युत पुरवठ्याच्या प्रश्न राज्यामध्ये पेटलेला होता. सुरळीत आणि दिवसा कृषीपंपासाठी विद्युत पुरवठ्याची मागणी करीत शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी आंदोलने, मोर्चे काढले होते. हे सुरु असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावातील पाणी पुरवठ्याचाच विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केल्याने संतप्त ग्रामस्थांने महावितरणच्या कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. अंगावर डिझेल ओतत ग्रामस्थ थेट कार्यालयात घुसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. सदरील ग्रामस्थ डिझेलने ओलाचिंब झाल्याने नेमके काय करावे हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर होता. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

पूर्वसूचना न देता विद्युत पुरवठा खंडीत
किमान गावच्या पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडीत करताना पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. असे असताना महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई केल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे तर दुसरीकडे अधिकारी मात्र, पूर्वसूचना दिल्याचे सांगत आहेत. या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ महावितरणच्या कार्यालयात दाखल झाले होते.

पाणी असूनही पुरवठा बंद
यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात देखील गावाला पाणीपुरवठा होईल एवढा साठा आहे. मात्र, महावितरणच्या कारवाईमुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. एकीकडे कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहीम सुरु असतानाच महावितरणने थेट पाणीपुरवठ्याचाही विद्युत पुरवठा खंडीत केल्याने तीन गावचे ग्रामस्थ हे आक्रमक झाले होते. सुरळीत विद्युत पुरवठ्याच्या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालयात दाखल होताच एकाने थेट अंगावर डिझेल ओतून घेतले होते.

ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
महावितरणच्या कार्यालयात दाखल झालेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्याचा प्रयत्न काही अधिकारी करीत होती. मात्र, याला ग्रामस्थांचा विरोध होता. पाणी पुरवठ्याचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा अधिकार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते. तर धक्काबुक्की करुन बाहेर काढले जात असल्याने ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र, विद्युत पुरवठा सुरळीत केल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे प्रकरण मिटले असून प्रत्यक्षात केव्हा विद्युत पुरवठा सुरळीत होणार हे पहावे लागणार आहे.

Related Articles

Back to top button
??????