ताज्या घडामोडी

कोटीतीर्थ तलावात शेकडो मासे मृत

मुबारक आत्तार : कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील कोटीतीर्थ तलावात अज्ञात व्यक्तीने घातक केमिकल्स टाकल्याने शेकडो मासे मृत झाल्याने खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते यांनी हे मृत मासे काढून तलावाची स्वच्छता केली असून या प्रकरणाची चौकशी अंती दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
कोल्हापूर शहराची एकेकाळी ‘तलावांचे शहर’ म्हणून ओळख होती, पण हळूहळू ही ओळख नामशेष होत आहे. शहराचा विस्तार जसजसा वाढत जाईल तसतसा तलावांचा विस्तार कमी होऊन त्यांच्या प्रदूषणात भरच पडत आहे. शहरातील सांडपाणी, निर्माल्य, जनावरे, कपडे धुणे, अंघोळ करणे या सर्व कारणांमुळे तलावांचे पाणी दूषित होऊन त्यांना जलपर्णीने विळखा घातला आहे. त्यातून त्यांची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. पूर्वी लोक पहाटेच्या वेळी निसर्गरम्य वातावरणात तलावांमध्ये पोहायला जात असत. पण सध्या तलावांची दयनीय अवस्था पाहता लोक चार हात दूरच जात आहेत.

माणसाने कितीही प्रगती केली तरी जसे कृत्रिम रक्त बनवता येत नाही, त्याचप्रमाणे पाणीही निर्माण करता येत नाही. या गोष्टी निसर्गावरच अवलंबून असतात. पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी स्वच्छ आणि प्रदूषणविरहित ठेवणे ही आपली सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. मात्र, या नैतिक जबाबदारीचे पालन चार-दोन सामाजिक कार्यकर्ते सोडले तर बहुतांशजण करत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पाणी बचत आणि उपलब्ध पाणी पिण्यायोग्य बनविण्याबाबतची चळवळ राबविण्याची वेळ आली आहे.
निसर्ग आणि माणूस यांचे नाते इतर जीवजंतूंसारखेच आहे. त्यामुळे निसर्गातील इतर पशु-पक्ष्यांकडे पाहिले तर कुठलाही घटक पाण्याचे प्रदूषण करत नाही. उलट मासे, खेकडे, बगळे, बदक, आदी हे सर्व जीव पाण्याची पर्यावरण साखळी संतुलित ठेवण्याचेच काम करतात. मात्र, माणसाच्या बाबतीत उलटा व्यवहार आहे. आपल्या पूर्वजांनी गावानजीक जाणीवपूर्वक संवर्धन करून ठेवलेले पाणीसाठे आता प्रदूषणाच्या समस्येने वेढलेले आहे.
उदाहरणादाखल घ्यायचे तर कोटीतीर्थ तलाव या मोठ्या तलावाचे पाणी वर्षानुवर्षे पिण्यासाठी वापरले जात नाही. घराशेजारी असणारे हे नैसर्गिक स्रोत माणसांच्या बेपर्वाईमुळे दूषित बनले आहेत. भविष्यातील पाणीटंचाईचा विचार केला तर पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी हे सर्वांत स्वस्त आणि मुबलक पर्याय आहेत. मात्र, जवळच्या गोष्टींचे महत्त्व आपण नजरेआड करतो. त्याच पद्धतीने या नैसर्गिक व मुबलक स्रोतांकडे आपण जाणीवर्पूक दुर्लक्ष करत आलो आहोत.
त्यामुळे कोल्हापूरसारख्या पाणीदार शहराला पाण्याची सढळ उपलब्धता असूनही फक्त पाणी स्वच्छ नसल्याच्या कारणाने काळम्मावाडी धरणातून पाणी आणावे लागत आहे. प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व समजून घेऊन जर पाणी नैसर्गिक स्वरूपातच राखण्याचा प्रयत्न केला तर शुद्ध पाणी अत्यंत स्वस्त व मुबलक प्रमाणात सर्वांनाच उपलब्ध होईल.

Related Articles

Back to top button
??????