ताज्या घडामोडी

राज्यातील कामगारांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी प्रयत्नशील

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

कोल्हापूर,: जिल्ह्यातील कामगार विभागामार्फत 1.15 लाख कामगारांना मागणीनूसार गृहपयोगी वस्तू संच वाटप होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. साडे चार कोटींपैकी काहीच नोंदीत कामगार आहेत. उर्वरीत शेत कामगार, कापड उद्योग कामगार, हॉटेल व्यवसायातील कामगार, ट्रक चालक, रिक्षा चालक तसेच इतर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांसाठी मंडळे स्थापन करून त्यांचेही जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल. भारत देश महासत्ता बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीनमधे आणण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठीच येत्या काळात कामगारांसाठी प्राधान्याने शासनाकडून विविध योजना आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचे सह मोठ्या संख्येने नोंदीत बांधकाम कामगार उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात 10 नोंदीत कामगारांना कामगार विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले. पालकमंत्री मुश्रीफ यांचे स्वागत तृणधान्याचे बकेट देवून सहायक कामगार आयुक्त घोडके यांनी केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना शासकीय योजनांचे चांगल्या प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले.

कोल्हापूर जिल्ह्यात 1.15 लाख नोंदीत कामगार यासाठी पात्र आहेत. ही योजना दोन वर्षे सुरू राहणार असून एका कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे संच मिळविण्यासाठी घाई न करता, कामगारांनी 9307059989 या मोबाईल क्रमांकावर संच मिळण्यासाठी नोंदणी करावी. किंवा प्रत्यक्ष येवून मुस्कान लॉन, कोल्हापूर येथे टोकन घ्यावे. नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संच वाटप होईल. दर दिवशी 500 संच वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे कामगार विभागाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button
??????