आपला जिल्हा

‘त्‍या’ कुटुंबाला भोगावी लागली न केलेल्‍या कृत्‍याची शिक्षा

कोल्‍हापूर :  रविवारची मध्यरात्र… रेंदाळमधील अंबाईनगरात काळोख… जणू स्मशान शांतता… गल्‍लीतल्या मध्यावर शौकत शेख यांचं टुमदार घर… दरवाजावर दोन-चारवेळा धडाधड असा आवाज झाला… अंगाचा जणू थरकाप उडाला. मध्यान रात्री अवेळी कोण? चोर, दरोडेखोर तर नव्हेत… फटीतून हळूच डोकावले… दहा ते बारा जण प्रवेशद्वारात उभे ठाकलेले… दरवाजा उघडताच त्याच क्षणी सारेच घरात घुसले. ‘इर्शाद… इर्शाद… कहा हैं? बेडरूममध्ये झोपला आहे,’ हे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच इर्शादच्या खोलीत गराडा पडला. कुटुंबीयांना नजर कैदेत ठेवून इर्शादवर प्रश्‍नांचा (shield) भडीमार सुरू राहिला. दहशतवादी संघटनांशी इर्शादचा थेट संबंध असल्याच्या संशयावरून मुंबई व दिल्‍लीतील विशेष पथकाने घरावर छापा टाकल्याची प्राथमिक माहिती कानावर पडली. या घटनेमुळे कुटुंबप्रमुख शौकत (वय 65), मुलगा इर्शाद, अल्ताफ, सून जोया यांच्यावर आकाश कोसळले. प्रवेशद्वारासह सर्वच खोल्यांमध्ये पहारा ठेवून पथकाची झाडाझडती सुरू झाली. स्वयंपाक खोलीतील भांड्यांसह फ्रिज, तिजोरी, कपाट, बॅगांमधील साहित्याची (shield) तपासणी केली. खोलीत पडलेल्या कागदी चिटकोर्‍याही ताब्यात घेण्यात आल्या.

मध्यरात्री साडेतीनला सुरू झालेली चौकशी सकाळी साडेआठपर्यंत बंद खोलीत सुरूच होती. याकाळात कुटुंबीयांतील कोणालाही जागचे हलू दिले नव्हते. संभाषण करण्यासही मनाई करण्यात आली होती. रोज पहाटेला उठणारे शौकतभाई अजूनही घरातून बाहेर आले नाहीत. दरवाजाही बंद… शेजार्‍यांना शंका आली. शेजार्‍यांनी घराकडे डोकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वारावर थांबलेल्या रक्षकांनी त्यांना मनाई केली. शौकतभाईंच्या घरात नेमके काय घडले असेल, याची कुजबूज सुरू झाली.
इर्शादचा दहशतवाद्यांशी संबंध?

कोणी म्हणाले, बरे-वाईट घडले असेल. शंका-कुशंका सुरू झाल्या. त्यात एकाने छापा पडल्याचे सांगून टाकले. थोड्या वेळाने बातमी आली… इर्शादचा दहशतवादी संघटनांशी संबंध असून मुंबई-दिल्‍लीतल्या एन.आय.ए.च्या (राष्ट्रीय तपास संस्था) पथकाने छापा टाकून सर्वांनाच ताब्यात घेतल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियासह दूरचित्रवाहिन्यांवरही बातम्या झळकू लागल्या.अंबाईनगरात तोबा गर्दी होऊ लागली.

प्रत्येकजण खुन्‍नस देवू लागला!

सकाळी साडेनऊला पथकातील अधिकार्‍यांसमवेत संशयित इर्शाद, भाऊ अल्ताफ घरातून बाहेर आले. फौजफाटा कोल्हापूरकडे रवाना झाला. एनआयएच्या छापा कारवाईची बातमी वार्‍यासारखी शहरासह जिल्ह्यात, राज्यात सर्वत्र पसरली. माध्यमांच्या प्रतिनिधींचे लोंढे रेंदाळच्या अंबाईनगरच्या दिशेने लागले. काही संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांनीही धाव घेतली. दहशतवाद्यांशी कनेक्शन… संताप, तणावाची स्थिती निर्माण झाली. शौकतभाईंच्या घराकडे बघणार्‍यांचा रोखच बदलला! प्रत्येकजण खुन्‍नस देवू लागला.

शौकतभाईंसह ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्‍वास

पोलिसांनी घराला वेढा देऊन कुटुंबीयांना संरक्षण दिले. अधिकारी मंडळी जमावाची समजूत काढत असतानाच इर्शाद व अल्ताफचा काहीही संबंध नसल्याने पथकाने दोन्हीही भावांना सोडून दिल्याची बातमी हुपरी, रेंदाळ परिसरात धडकली. काही वेळात इर्शादही भावासमवेत थेट घरात पोहोचला. केवळ संघटनेच्या नामसाधर्म्यामुळे इर्शादला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आल्याने ग्रामस्थांसह शेख कुटुंबीय, नातेवाईकांनी मोकळा श्‍वास घेतला.

नामसाधर्म्यामुळे इर्शाद रेकॉर्डवर

इर्शाद शेख व कुटुंबीय चांदी कारागीर आहेत. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या इर्शादने 2019 मध्ये ‘लबैक इमदाद फाऊंडेशन रेंदाळ’ या संघटनेची नोंदणी केली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांसह अंध, अपंग तसेच गरजूंना संस्थेमार्फत सहाय्य करण्यात येते. मात्र ‘अतेहिद लब्बेक फाऊंडेशन’ ही दहशतवादी कारवायांशी संबंधित असल्याने ‘एनआयए’च्या रडारवर आहे. नामसाधर्म्यामुळे इर्शाद रेकॉर्डवर आला होता. दोन महिन्यांपासून त्याच्यावर वॉच होता. अखेर चौकशीअंती इर्शादच्या संघटनेचा काहीही संबंध नसल्याचे उघड झाल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली.

शेख कुटुंबिय दिवसभर तणावात

शेख कुटुंबीय दिवसभर प्रचंड तणावात होते. सारेच सैरभैर झाले असताना संतप्त जमावाने कार्यालयाची तोडफोड करून साहित्याची नासधूस केल्याची बातमी कानावर येताच शौकतभाई हतबल झाले. जमावाने घरावर चाल केल्यास? परमेश्वरांकडे हात जोडून ‘देवा, कुटुंबाचं रक्षण कर…’, असे म्हणत त्यांचे अंग थरथरत होते.

जीवाच्या भीतीने चिमुरडे भिंतीआड दडले

डोळ्यांतून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. चिमुरडी पोरं जीवाच्या भीतीने एका कोपर्‍यात दडून बसली होती. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते, अशी परिस्थिती असतानाच हुपरीचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पाठोपाठ पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनीही दाखल झाले.

कुटुंबीयांचा आक्रोश

संतप्त आणि तणावपूर्ण स्थितीत प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. घरापासून काही अंतरावर इर्शादच्या ‘लबैक ईमदाद फाऊंडेशन’च्या संपर्क कार्यालयासमोर गर्दी होऊ लागली. कोणत्याही क्षणी अनुचित प्रकार घडू शकेल, अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच शौकतभाई, सून जोया, पुतणी आसमा आणि चिमुरड्या नातवांसमवेत धाय मोकलून रडत होते. माझ्या मुलांचा कोणत्याही अतिरेकी संघटनांशी संबंध नाही. त्याने काहीही गैर केले नाही, असे छातीवर हात ठेवून सांगत होते. मुलींसह सुनांचा आक्रोश सुरू होता.

Related Articles

Back to top button
??????