ताज्या घडामोडी

संशियीत क्षयरोग रुग्णांच्या तपासण्या वाढवा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : जिल्ह्यात क्षयरोग तपासणीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच क्षयरोगाबाबत व्यापक जनजागृती करुन क्षयरोग रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा द्याव्यात. जिल्ह्यातील क्षयरोगग्रस्त रुग्णांना ‘निडली’ॲपच्या माध्यमातून औषधोपचार, जनजागृती, आर्थिक मदत व अन्य वैद्यकीय सेवांबाबत संदेश पाठवून त्यांच्या नियमित संपर्कात रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जिल्हास्तरीय टीबी फोरम व को-मॉर्बीडिटी बैठकीत दिल्या.

जिल्हास्तरीय टीबी फोरम व को-मॉर्बिडिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यू. जी. कुंभार, सीपीआरच्या टीबी विभाग प्रमुख डॉ.अनिता सैबन्नावार, डॉ. कुरुंदवाडे, डॉ. मनीष पाटील, डॉ. रुपाली भाट, डॉ. विनायक भोई, डॉ. रूपाली दळवी, डॉ. दातार, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. गीता पिल्लई यांच्यासह आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी सादरीकरणातून जिल्ह्यातील टिबी कार्यक्रमाची माहिती दिली.

जिल्ह्यातील ज्या औषध दुकानातून टीबीच्या औषधांची विक्री केली जाते अशा दुकानांची अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत यादी प्राप्त करुन घ्यावी. अशा दुकानांसमोर टीबी आजाराबाबत जनजागृतीसाठी स्टॅण्डी लावावी. गेल्या ३ वर्षामध्ये एकही क्षयरुग्ण नाही अशा गावांसाठी बक्षीस योजना राबवावी. खाजगी मेडिकल स्टोअर्स व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी क्षयरुग्णांची नोंदणी वेळेवर करावी. संजय गांधी निराधार योजना व एस. टी. प्रवास भाडे सवलत योजनाचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना याचा लाभ देण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी  रेखावार यांनी बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे निकष पूर्ण करणारे 6 टीबी रूग्ण आहेत तर एसटी पास सवलतीसाठी 90 रुग्णांना लाभ दिला आहे. शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार क्षयरोग संशयितांचे टेस्टिंग वाढवावे. नवीन संशयीत रूग्ण शोधणेचा दर हा एक लाख लोकसंख्येमागे ३४०० संशयित शोधणे इतका आहे. यासाठी तपासणी वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यामध्ये क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण हे एक लाख लोकसंख्येमागे 3 ते ४ रुग्ण असे आहे. तर नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे ८० इतके आहे. क्षयरुग्णाला मोफत निदान, औषधोपचार यासह विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जातो, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच प्रयोगशाळा, एक्स रे, सीबीनॅट तपासणी मोफत केली जात असून याचा संशयित रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

टीबी रुग्णांची एचआयव्ही व डायबिटीक तपासणी शंभर टक्के केल्याबद्दल क्षयरोग केंद्राचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button
??????