आपला जिल्हाताज्या घडामोडी

जिल्ह्यात कोरोना निर्बंधात शिथिलता

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आदेश

कोल्हापूर  : राज्यात कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर असलेला ताण कमी झाला आणि स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. जिल्ह्यात यापूर्वी लागू करण्यात आलेल्या सर्व निर्बंधांना शिथिलता देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमित केले आहेत.

दिनांक १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. असे असले तरी भविष्यात कोविड-१९ चा संभावित धोका टाळण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क घालणे व दोन्ही लस घेणे यावर भर देण्याचे सूचित करण्यात आले आहे. आरोग्यासंबंधी सर्व नियमांचे पालन करून स्वत:बरोबरच इतरांचीही काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोविड-१९ च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ मधील तरतुदी प्रमाणे लागू केलेले सर्व निर्बंध याद्वारे मागे घेण्यात येत असून ते ०७ एप्रिल २०२२ च्या मध्यरात्री ००.०० वाजेपासून पुढे अंमलात राहणार नाहीत. दिनांक २२ मार्च २०२२ रोजी केंद्रीय गृह सचिव आणि त्यानंतर २३ मार्च २०२२ रोजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकातील सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन निर्णयाची अंमलबजावणी करावी.

जिल्ह्यातील सर्व नागरिक, व्यापारी आस्थापना, संघटना, संस्थांनी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे इ. कोविड अनुरुप वर्तन चालू ठेवावे त्यामुळे आरोग्यास धोका उद्भवणार नाही आणि समाजात रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव टाळता येईल.

जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणांनांनी दक्ष रहावे व आपल्या अखत्यारीतील कार्यक्षेत्रात कोविड-१९ चे नवीन प्रकरण, उपचार चालू असलेले रुग्णांची संख्या, पॉझिटिव्हिटी दर तसेच वैद्यकीय संस्था आणि रुग्णालयातील व्यापलेल्या बेड्सची संख्या याकडे बारकाईने लक्ष द्यावे. जर यातील काहीही धोकादायक वाटल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनास याची तात्काळ माहिती द्यावी जेणेकरून प्राथमिक स्थितीतच रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी उपयुक्त अशी उपाययोजना करता येईल. यासोबतच लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्यावर भर द्यावा, असे आदेशात नमुद आहे.

Related Articles

Back to top button
??????