ताज्या घडामोडी

गांधीनगरमध्ये चेट्रीचंड उत्सवाची जोरदार तयारी गांधीनगर बाजारपेठ शनिवारी बंद राहणार

कोल्हापूर ; सिंधी समाजाचे आराध्य दैवत श्री झुलेलाल यांचा ७२० वा जन्मदिन म्हणजेच चेट्रीचंड उत्सव शनिवारी (दि.२) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून , त्या दिवशी संपूर्ण गांधीनगर बाजारपेठ बंद राहणार आहे. असा निर्णय सिंधी सेंट्रल पंचायतीच्या सभागृहात चेट्रीचंड उत्सवाबाबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सिंधी सेंट्रल पंचायतीचे अध्यक्ष गुवालदास कटार होते.
शनिवारी गुढीपाडवा असून त्याच दिवशी सिंधी बांधवांचे आराध्य दैवत श्री झुलेलाल यांचा जन्मदिन आहे. हा जन्मदिन चेट्रीचंड उत्सव म्हणून साजरा होतो. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे हा उत्सव अत्यंत साधेपणाने घरोघरी साजरा केला. सद्यस्थितीत कोरोना महामारीचा धोका कमी झाल्यामुळे हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय सिंधी बांधवांच्या वतीने घेण्यात आला. होलसेल, रिटेल व किराणा दुकानासह संपूर्ण बाजारपेठ या दिवशी बंद राहणार आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजता श्री झुलेलाल यांच्यावर सिंधी सेंट्रल पंचायतीमध्ये अभिषेक करण्यात येईल. दुपारी दीड वाजता महाप्रसाद आयोजित केला आहे. त्यानंतर साडेचार वाजता आराध्य दैवत श्री झुलेलाल यांच्या मिरवणुकीस सिंधी सेंट्रल पंचायत-प्रेम प्रकाश मंदिरापासून ढोल-ताशांच्या निनादात प्रारंभ होईल. सिंधू मार्केट, मुख्य बसस्थानक, शिरू चौक, गणपती मंदिर परिसर, गांधी पुतळा, साईबाबा मंदिर यांसह प्रमुख चौकांमध्ये मिरवणूक वाजत-गाजत जाणार आहे. विश्वशांतीसाठी आशीर्वादाची याचना करत पंचगंगा नदीवरील स्वामी शांतीप्रकाश घाटावर मिरवणुकीची सांगता होणार आहे.
मदनलाल मलानी, मनोज वंजानी, बक्षाराम दर्डा, लीलाराम मनचुडिया, अशोक तेहल्यानी, सेवाराम तलरेजा, बाजूमल अहुजा यांनी जयंतीच्या तयारीची माहिती दिली.

Related Articles

Back to top button
??????