ताज्या घडामोडी

स्त्री सन्मानाचा माझा संघर्ष हा स्त्रीमुक्तीसाठी नसून स्त्री समतेसाठी…. रूपाताई वायदंडे

सांगली जिल्हा येथे समाजरत्न पुरस्कार प्रदान

सांगली : व्हॅाट्सअप आणि सोशल मीडियातून एक दिवसासाठी स्त्री सन्मानाचे स्टेटस ठेवणे आणि स्त्रीमुक्तीच्या बेगडी गप्पा मारणे या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा न करता स्त्रियांना अखंड सन्मान मिळाला पाहिजे, याकरिता टोकाचा संघर्ष करणार. माझा संघर्ष हा स्त्रीमुक्तीसाठी नसून स्त्री सन्मान आणि स्त्री समतेसाठी आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिव रूपाताई वायदंडे यांनी आज केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जय गंगा तारा सांस्कृतीक कलाकार संघटनेच्यावतीने “खरे मंगल कार्यालय, सांगली” येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात “समाजरत्न” पुरस्कार स्वीकारताना त्या बोलत होत्या.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती जयश्रीताई पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम साकार झाला.
यावेळी बोलताना रूपाताई वायदंडे यांनी हा पुरस्कार सहजासहजी मिळाला नसून त्याच्या पाठीमागे पंधरा वर्षाचे सामाजिक कार्य, चळवळी प्रती प्रामाणिकपणा, कामातील सातत्य आणि मोठा संघर्ष असल्याचे सांगितले. बाहेरच्या जिल्ह्यात कामाची दखल घेऊन त्या कामाचा गौरव होणे हि निश्चितपणे सुखावणारी बाब असून, या पुरस्कारामुळे स्त्रियांच्या अधिकारासाठी लढण्याची मोठी ऊर्जा मिळाल्यासारखे वाटत आहे असेही त्या म्हणाल्या. हत्ती, घोडे, पालखी यांच्या मिरवणुकीतून पुष्पवृष्टी करत स्त्रियांना सभामंडपात आणून त्यांचा सन्मान करणे हि खरोखर प्रचंड ताकद देणारे गोष्ट असून हा केवळ पुरस्कार नसून एक “प्रेरणा” आहे असेही त्या म्हणाल्या.
काही अपवाद वगळता बहुतांशी ठिकाणी स्त्रीला आजही फक्त शोभेची वस्तू म्हणून पाहिले जाते. पुरुषसत्ताक संस्कृतीमधे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मानसिकता बदलणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगत, गेले अनेक वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम करत असल्याच्या अनुभवावरून आज येथे सांगावेसे वाटते कि, सामाजिक चळवळीमध्ये भाग घेऊ पाहणाऱ्या अनेक स्त्रिया या पुरुषांच्या धक्काबुक्कीला बुजून सार्वजनिक कार्यक्रमात व गर्दीच्या सामाजिक कार्यक्रमाच्या ठिकाणी पुन्हा सहभागी होण्यासाठी नापसंती दाखवतात हि अतिशय खेदाची बाब आहे, हे शल्य वायदंडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास उपस्थित मराठी सिनेसृष्टीतील तारकांना उद्देशून त्या म्हणाल्या कि, प्रत्येक स्त्री हि आपल्या जीवनातील व कुटुंबातील नायिकाच असते. कला, क्रीडा, सांस्कृतिक, नाट्य, उद्योग, व्यवसाय, नोकरी अशा अनेक ठिकाणी महिलांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. परंतु फक्त राजकीय आणि सामाजिक ठिकाणीच महिलांची गोची होतानाचे चित्र आज समाजामध्ये पाहायला मिळते आणि हे चित्र बदलण्यासाठी टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे आणि तो संघर्ष करत महिलांनी स्वतःला सिद्ध करावं आणि पुरुषसत्ताक संस्कृतीला छेद देत स्वतःचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्व उभा करावं असं आवाहन हि त्यांनी समस्त महिला वर्गाला यावेळी केलं.

देशातील करोडो महिलांना संविधानिक हक्क देणाऱे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे नेऊन स्त्री समतेसाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी महिलावर्गास दिली.
या वेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका जयश्रीताई पाटील, डी. वाय. एस. पी. मुल्ला मॅडम, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे माजी उपायुक्त कोळेकर साहेब, जय गंगा तारा संस्कृती कलाकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड, कार्याध्यक्ष कादरभाई मेस्त्री यांच्यासह लोकप्रिय मराठी मालिकांतील सीनेतारका व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Related Articles

Back to top button
??????