ताज्या घडामोडी

लोकशाही बळकटीकरणासाठी कायदा महत्वाचा : प्रा. डॉ. श्रीपाद देसाई

कोल्हापूर  : आजच्या असमानता वाढणार्‍या जगामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणे अवघड झाले आहे. वास्तविक न्यायिक जगण्याची प्रक्रिया विकसित करायची असेल तर सर्वांना स्वस्त आणि समान न्याय मिळणे गरजेचे आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी खास प्रयत्न होणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी कायदाही महत्वाची भूमिका पार पाडेल असे प्रतिपादन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ, भारतीय संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ. श्रीपाद देसाई यांनी केले.
कायदा आणि सामाजिक परिवर्तन या महत्त्वाच्या विषयावरील संशोधन परिपूर्ण केल्यानंतर जळगाव विद्यापीठाने प्रा. डॉ. श्रीपाद देसाई यांना पी एच. डी. ही पदवी प्रधान केल्याबद्दल त्यांचा कोल्हापूरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बबनराव रानगे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि बुद्धांची फ्रेम देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
बबनराव रानगे म्हणाले, प्रा. डॉ. श्रीपाद देसाई यांनी सामाजिक बांधिलकी मानून समाज उपयोगी संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनाचा विविध सामाजिक चळवळींना फायदा होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी व लेखक प्रा. वसंत भागवत म्हणाले, प्रा. डॉ. श्रीपाद देसाई यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर संशोधन केले आहे. कायद्याच्या अनेक विद्यार्थ्यांना हे संशोधन उपयोगी पडेल.
यावेळी ॲड. शितल देसाई, ॲड. अकबर मकानदार यांनी मनोगते व्यक्त केली.
सत्कार समारंभाचे आयोजन निर्मिती विचारमंच, कोल्हापूर, निर्मिती लॉगल असोसिएशन आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने निमंत्रक अनिल म्हमाने, प्रा. शोभा चाळके, ॲड. करुणा विमल, ॲड. अधिक चाळके, डॉ. दयानंद ठाणेकर, ॲड. तौसिफ मुल्लानी, ॲड. प्रविण चव्हाण, ॲड. प्रतिभा चव्हाण यांनी केले होते.
स्वागत व प्रास्ताविक अनिल म्हमाने यांनी केले. आभार प्रा. शोभा चाळके यांनी मानले.

Related Articles

Back to top button
??????