ताज्या घडामोडी

क्षयरोगमुक्त भारत करण्यासाठी समाज सहभाग आवश्यक : डॉ.दुर्गादास पांडे

क्षयरोगमुक्त भारत अभियानाची कोल्हापूरमधुन सुरुवात

कोल्हापूर  : क्षयरोगाची नोंदणी व्यवस्थ‍ित झाली नाही तर त्या व्यक्तीपासून त्याचा प्रसार होऊन त्याचा परिणाम क्षयरुग्ण वाढीवर होतो. सध्या लहान मुलांमधील क्षयरोगाचा धोका वाढत चालला आहे. लहान मुलांमधील क्षयरोग निदान करणे थोडे अवघड आहे, पण ते करणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाबरोबरच समाजातील लोकांची जबाबदारी तितकीच आहे. त्यांनी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास स्वतःहुन तपासणी करून घ्यावी. शासकीय आरोग्य संस्थेमध्ये निदान, उपचार मोफत आहेत याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक डॉ.दुर्गादास पांडे यांनी केले.

राजाराम कॉलेज येथील यशवंत सभागृहात जिल्हा क्षयरोग केंद्र कोल्हापूर आयोजित जागतिक क्षयरोगदिन व क्षयरोगमुक्त भारत अभियान उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्षयरोगमुक्त भारत अभियानाची कोल्हापुर येथून सुरुवात फित कापून करण्यात आली. त्यानंतर क्षयरोग नोटिफिकेशन स्टिकरचे अनावरण करण्यात आले. कळे येथील अशा स्वंयसेविका यांनी टी.बी.जनजगरण पथनाट्य सादर केले. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी व उपस्थितांनी क्षयरोग जनजागरणपर शपथ घेतली.

उपसंचालक डॉ. पांडे यांनी जयसिंगपुर येथील शशिकला क्षयरोगधामचे आधुनिकीकरण करून तिथे सर्वांच्या सहभागाने आयसोलेशन केंद्र, नैसर्गिक गार्डन व विविध सुविधा पुरविण्याची ग्वाही यावेळी दिली. तसेच विविध प्रसिद्धी माध्यमांनी क्षयरोगाबाबत विविध जनजागृतीपर माहिती, योजना वेळोवेळी माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी व क्षयरोग मुक्तीसाठी हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, आपल्या जिल्ह्यामध्ये क्षयरोग निदानाची सोय पुरेशी आहे. निक्षय पोषण आहार योजनेअंतर्गत क्षयरुगांना दरमहा ५०० रुपये मिळतात. ही क्षयमुक्त भारताकडे वाटचाल आहे. सर्व समाजाच्या सहभागाने प्रथम कोल्हापुर जिल्हा क्षयमुक्त करूया. रुग्णांसाठी औषधोपचार सुरू असे पर्यंत पोषण आहारासाठीं दरमहा ५०० रुपये अनुदान शासनातर्फे दिले जाते. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना निदानासाठी ५०० रुपये व औषधोपचार पूर्ण केल्यावर ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. सर्व खासगी डॉक्टरांनी सर्व क्षयरुगांची नोंद निक्षयमध्ये करण्याचे अवाहन त्यांनी केले.

जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार यांनी जागतिक क्षयरोगदिन व क्षयरोग मुक्त भारत अभियानाबाबत माहिती दिली. अभियानाची माहिती देताना त्या म्हणाल्या, सर्व उपकेद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील आरोग्यवर्धिनी केंद्र व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर २४ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा हेतू हा आरोग्यवर्धिनीकेंद्र हे क्षयरोग सेवांचे सर्वसमावेशक आरोग्य सेवा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे, या ठिकाणी क्षयरोग तपासणी, निदान आणि उपचार या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात व सर्वसमावेशक टीबी प्रतिबंधक सेवांची उपलब्धता व्हावी हा आहे. या वर्षीचे घोषवाक्य ‘Invest to End TB. Save Lives टी.बी. संपवण्यासाठी गुंतवणुक करा व जीव वाचवा हे आहे. हे अभियान सर्व सहभागाने यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. मानसी कदम यांनी मान्यवरांचे आभार तर सूत्रसंचालन नामदेव सावंत व नयना पाटील यांनी केले. आशा स्वयंसेविकांच्या वक्तृत्वस्पर्धा, आरोग्य कर्मचारी यांच्या म्हणी-स्लोगन स्पर्धा, समुदाय आरोग्य अधिकारी पोस्टर स्पर्धा विजेत्यांना व विविध गटातील नामनिर्देशित व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. टीबी युनिट राधानगरी, कागल, शाहूवाडी, उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज,प्राथमिक आरोग्य केंद्र कोतोली या संस्थांचा उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. १२ टीबी युनिटमधून क्षयरोग कामकाजावर आधारित उत्कृष्ट समुदाय आरोग्य अधिकारी यांची निवड करून त्यांना गौरवण्यात आले. क्षयरुगांना मदत केलेल्या संस्था जसे अथर्व कॉम्प्युटर्स, श्रीकांत सर्जिकल, श्री महालक्ष्मी डीस्ट्रीब्युटर व बाजीराव चौगले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे, एच.एफ. डब्लू.टी.सी.च्या प्राचार्या डॉ. सुप्रिया देशमुख, डॉ.विनायक भोई, डॉ. नितीन कुंभार सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीयअधीक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, एन.टी.ई.पी. कार्यक्रमाचे अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा क्षयरोग केंद्राचे अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button
??????