ताज्या घडामोडी

तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त मतदार नोंदणीची विशेष शिबिरे

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी दिन म्हणून ३१ मार्च हा दिवस जगभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर या जिल्ह्यांत २७ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत, तर उर्वरित महाराष्ट्रात २७ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत ही नोंदणी शिबिरे राबवली जाणार आहेत.

तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. १८ ते २१ वयोगटातील ज्या तृतीयपंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्याच्या गुरू माँने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. २१ वर्षांवरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच वय सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तीच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुद्धा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रांनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत म्हणजे मतदार नोंदणीच्या मोहिमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करून घेण्यात आली होती.

महाराष्ट्रातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तींनी या मोहिमेला सहकार्य करून अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील ज्या भागात तृतीय पंथीयांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत, अशा ठिकाणी मतदार नोंदणीची शिबिरे आयोजित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
??????