ताज्या घडामोडी

स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त शाहू छत्रपती मिल येथे स्टार्टअप व इन्वेस्टर समिटचे आयोजन

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वा निमित्त आयोजित स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये जिल्ह्यातील व्यापार व उद्योग घटकांनी सहभागी व्हावे. स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या उद्योग वाढीसाठी हातभार लागेल आणि यातून कोल्हापूरचा एक वेगळा ब्रँण्ड विकसित होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्यक्त केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी असून त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्तने १८ एप्रिल ते २२ मे २०२२ कालावधीत विविध कार्यक्रम व उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘कृतज्ञता पर्वा निमित्त नव उद्योकांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. २ ते ४ मे २०२२ या कालावधीत शाहू छत्रपती मिल येथे स्टार्टअप व इन्वेस्टर समिटचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी रेसिडन्सी क्लब येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. रेखावार बोलत होते. यावेळी मेनन इंडस्ट्रिजचे सचिन मेनन, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, क्रीडाईचे विद्यानंद बेडेकर, गोकुळ शिरगाव एमआयडीचे मोहनराव पंडित यांच्यासह जिल्ह्यातील मान्यवर उद्योजक व व्यापारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्याला वेगळा इतिहास असून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या दूरदृष्टिने कृषि व्यापार, उद्योग घटकांच्या वाढीसाठी अनेक उपक्रम, योजना राबवून या भागाचा विकास केला आहे. त्यांच्या संकल्पनेतील विकास घडविण्यासाठी आता प्रत्येकाने पुढे येऊन जिल्ह्याच्या विकासामध्ये हातभार लावावा, हीच कृतज्ञता पर्वात राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली ठरेल.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, स्टार्टअप व इन्वेस्टर समिट उपक्रम हा या पर्वापुरता मर्यादित न राहता तो जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांमध्येही राबविण्याचा मानस आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळेल व जिल्ह्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होईल. स्टार्टअप व इन्वेस्टर समिटमध्ये व्यापार व उद्योग घटकांने आपल्या संबंधीचे क्षेत्र निवडून यामध्ये सहभाग नोंदवावा. सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर लिंक देण्यात आली असून याद्वारे आपले रजिस्ट्रेशन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

स्टार्टअप व इन्वेस्टर समिटसाठी सर्व ते सहकार्य केली जाईल, अशी ग्वाही उपस्थित उद्योजकांनी दिली.

Related Articles

Back to top button
??????