ताज्या घडामोडी

ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने सेवा द्या – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर :- ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत याबाबत सर्व विभागानी दक्ष राहावे. त्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून योजनांचा लाभ प्राधान्याने द्या,अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिल्या.

जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, पोलीस उपअधिक्षक प्रिया पाटील यांच्यसह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत असलेल्या सुविधांच्या माहितीची व्यापक प्रचार व प्रसिद्धी होणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक विभागाने ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांची प्रभावी प्रसिद्धी करावी. आपल्या विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, उपक्रमांना ठळक व व्यापक प्रसिद्धी द्यावी, जेणे करुन याचा लाभ सर्व जेष्ठ नागरिकांना घेता येईल. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा अहवाल सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडे पाठवावा. ज्येष्ठ नागरिकांचा वेळ चांगल्या प्रकारे जावा यासाठी विरंगुळा केंद्रे महत्वाची आहेत. यासाठी ग्रामपंचायत व नगरपालिकांनी विरंगुळा केंद्रे सुरू करावीत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना, सुविधा, कार्यक्रम घेण्यासाठी येणारा खर्च प्रत्येक विभागांनी आपल्या निधीमधून करावा. या बाबतचे अंदाजपत्रक प्रत्येक विभागाने करणे गरजेचे आहे. तसेच स्थानिक स्वराज संस्थानीही त्यांच्याकडील उपलब्ध निधीमधून याबाबतचा खर्च करावा, अशा सूचनाही बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या. या बरोबरच जेष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सामाजिक व स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक सेवा उपलध व्हाव्यात, त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी व्हावी यासाठी कसबा बवडा येथील सेवा रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती बैठकीत जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली. ओपीडीमध्ये जेष्ठ नागरीकांची नोंदणी, तपासणी, उपचार मोफत केले जाणार आहेत. तसेच आहार, व्यायाम, मानसिक आजार याबाबत योग्य ते मार्गदर्शन व समुपदेशन व पुनर्वसनात्मक सेवा पुरविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या वृद्धाश्रमांची तपासणी करण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी  रेखावार यांनी दिल्या. या समितीमध्ये जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, कामगार विभागाचे अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी यांचा सदस्य म्हणून समावेश करावा. या समितीने जिल्ह्यातील वृद्धाश्रमांची यादी तयार करुन त्यांची तपासणी. वृद्धांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधा, तसेच वृद्धाश्रमांच्या ठिकाणी असणारी गैरसोय याबाबतचा अहवाला ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीस सादर करावा. प्रत्येक सहा महिन्यानंतर या समितीने वृद्धाश्रमांची तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.

Related Articles

Back to top button
??????