बनावट पादत्राणे विकणाऱ्या गांधीनगरच्या व्यापाऱ्यावर गुन्हा
गांधीनगर :ह्युगो बॉस कंपनीची बॉस ब्रॅण्डची बनावट पादत्राणे विक्री करणाऱ्या गांधीनगर ग्रामपंचायत रोडवरील संतोष फुटवेअर या दुकानावर छापा टाकून ३१ हजार ७७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुकानाचे मालक भगवान परसुमल कुकरेजा (वय ५२, रा. निरंकारी कॉलनी, गांधीनगर) यांच्यावर स्वामित्व कायद्याचा भंग केल्याबद्दल गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गांधीनगर ग्रामपंचायत रोडवर संतोष फुटवेअर हे दुकान आहे. याठिकाणी ह्यूगो बॉस कंपनीची बॉस या ब्रँडची बनावट पादत्राणे साठा करून ती विकली जातात, अशी माहिती कंपनीचे अधिकारी महेश विष्णू कांबळे (रा. सुखदेव विहार, मथुरा रोड, नवी दिल्ली. मूळ रा. जनवाडी, शिवाजीनगर, पुणे) यांना मिळाली. कांबळे यांनी गांधीनगर पोलिसांच्या साह्याने संतोष फुटवेअर या दुकानात छापा टाकला असता तिथे ह्यूगो बॉस कंपनीचा बॉस या ब्रँडचा बनावट माल मिळून आला. यावेळी १८८ बनावट पादत्राणांचा ३१ हजार ७७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत ह्यूगो बॉस कंपनीचे अधिकारी महेश कांबळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संतोष फुटवेअरचे मालक भगवानदास परसूमल कुकरेजा यांच्यावर स्वामित्व कायद्याचा भंग केल्याबद्दल गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतचा अहवाल न्यायालयास सादर करण्यात आला आहे.