ताज्या घडामोडी

विधानसभा पोटनिवडणूक शांततेत पार पाडा

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर ; कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक 2022 शांततेत पार पाडा तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करा, अशा सूचना प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज केल्या.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच निवडणूक तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, पन्हाळाचे उपविभागीय अधिकारी अमित माळी तसेच महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान आवश्यक आहे. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जनजागृती करावी. कोल्हापूरमध्ये शांततेत निवडणूका पार पडतात. या पोटनिवडणूकीत देखील मतदानाचा टक्का वाढेल आणि निवडणूक शांततेत पार पडेल, असा विश्वास व्यक्त करुन गर्दी राहणाऱ्या मतदान केंद्र ठिकाणी अधिक पोलीस बंदोबस्त ठेवा. वाहने उपलब्ध करुन घ्या, अशा सूचना केल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर मास्क, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर ठेवा, अशा सूचना करुन श्री. देशपांडे म्हणाले, मतदारांना मतदान केंद्रावर कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार यांच्यासह सर्व मतदारांसाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांनुसार सुविधा उपलब्ध करुन द्या. मतदान विषयक कामातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सोयी -सुविधा, मतदान साहित्य वेळेत उपलब्ध करुन द्या, कर्मचाऱ्यांना वेळेत प्रशिक्षण द्या, Voters Helpline – app तसेच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याबाबत अन्य माध्यमांबरोबरच सोशल मीडियाद्वारे जनजागृती करा, असेही त्यांनी सांगितले.

पोट निवडणुकीसाठी प्रशासनाने चांगली तयारी केली असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन निवडणूक कामकाज चोख पार पाडा, असे सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी सांगितले.

 

276- कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन सज्ज असून ही पोट निवडणूक शांततेत पार पडेल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, सन 2019 मध्ये आचारसंहिता कालावधीत निवडणूकीच्या अनुषंगाने 4 दखलपात्र तर 4 अदखलपात्र गुन्हे होते. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) मंगेश चव्हाण हे नोडल अधिकारी आहेत. भरारी पथके (एफएसटी), स्थिर निगराणी पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्व्हेक्षण पथक (व्हिएसटी) स्थापन केले आहेत. या पोटनिवडणूकीसाठी 130 इमारतीमध्ये 358 मतदान केंद्रे आहेत. यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, प्रशिक्षण व्यवस्थापन, मतदान व मतमोजणी कर्मचारी व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, निवडणूक साहित्य वाटप व व्यवस्थापन, मतदान केंद्रावर सुविधा आदी साठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर व उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
??????