ताज्या घडामोडी

वैश्विक आव्हाने पेलणारी नारी शक्तीची तिटवेतील शहिद शिक्षण परिवार ही भविष्यात महाराष्ट्राची अनुकरणीय ओळख ठरेल

लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

कोल्हापूर:  ग्रामीण भागातील सृजनशील नारी शक्तीला बदलत्या संदर्भाने सक्षम करणाऱ्या तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाची आगामी काळात महाराष्ट्रातील एक अनुकरणीय शैक्षणिक उपक्रम ओळख म्हणून होईल ‘ असे प्रतिपादन निवृत्त सनदी अधिकारी आणि प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले . येथील शहीद वीर पत्नी लक्ष्मी महाविद्यालयाच्या प्रथम पदवीप्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एन. मगरे  होते .

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री देशमुख पुढे म्हणाले,” येणारे दशके महिलावर्ग गाजवतील हे ओळखून शहीद महाविद्यालय ग्रामीण विद्यार्थिनींना सक्षम बनवण्याचे कार्य करत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. आगामी काळ हा विविध क्षेत्रात स्थानिक ते वैश्विक पातळीवर नारी शक्ती च्या नेतृत्वाचा राहणार आहे , विज्ञान, निष्ठा आणि मानवता या मूल्यांवर आधारित आधुनिक समाज करण्याची जवाबदारी ही तरुण सुशिक्षित महिलांची आहे. हा महत्वाचा केंद्रीत बदल लक्षात घेवून शहीद शिक्षण परिवाराची वाटचाल विस्तारत जावी.

अध्यक्षीय  भाषणात एनएनडीटी चे माजी प्र – कुलगुरू डॉ. व्ही . ए . मगरे यांनी ‘ पुरोगामी प्रतिमेच्या महाराष्ट्रातील स्त्री – पुरुष जन्मदरातील वाढती दरी हा विषय सर्वांसाठीच चिंताजनक असला तरीही त्यावर नक्कीच मात करता येते हा विश्वास आजच्या पहिल्याच पदवीदान सोहळयातून शाहिद शिक्षण प्रसारक मंडळाने दाखवून दिला आहे , ही सकारात्मकता लाख मोलाची असून सर्वच तालुका स्तरावर त्यांचा विस्तार झाला पाहिजे ‘ असे  नमूद केले . संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक व नॅकचे सल्लागार डॉ . जगन्नाथ पाटील  म्हणाले ‘ कोल्हापूर जिल्ह्यास विविध पैलूंची शैक्षणिक परंपरा मोठी आहे. आजच्या माहिती विस्फोट आणि ग्लोबल व्हिलेज संदर्भाने ही परपंरा वैश्विक स्तरावर अधिक विकसित करण्यासाठी शहीद शिक्षण संस्था नक्कीच प्रयत्न करत राहील आणि भविष्यात याचा दखलपात्र असा दीपस्तंभ होईल.  कुटुंब, समाज आणि देशाच्या नैतिक , आर्थिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी भागीदार होण्यास सक्षम असलेल्या युवती घडविण्यासाठी कृतीशीलपणे विविध उपक्रमातून   कार्यरत राहू असा निर्धार ही व्यक्त केला . ‘   कार्यक्रमाच्या  प्रारंभी पसायदान आणि एसएनडीटी विद्यापीठ गीताने या सोहळ्यास प्रारंभ झाला . गत तीन वर्षातील विविध विविध शैक्षणिक उपक्रमाचा आढावा घेत प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्य प्रशांत पालकर यांनी सर्वांचे स्वागत केले .

या सोहळ्यात संस्थापिका वीरपत्नी लक्ष्मीबाई यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समुपदेशिका भावना चौधरी, आणि शिशु आधार केंद्र संस्थापिका – डॉ. प्रमिला जरग यांना “वीर नारी पुरस्कार 2022” ने गौरव पत्र देवून सन्मानित करण्यात आले . तसेच मान्यवर पाहुण्याच्या हस्ते संगणक व पत्रकारितेच्या प्रथम पदवी विध्यार्थिनींना पदवी प्रदान करण्यात आल्या आणि इन्फोसिस , टीसीएस , कॅपजेमिनी, टी इ कनेक्टिव्हिटी, टी सिस्टिमसह आदि विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय कंपन्यात निवड झालेल्या विधार्थिनींचा गौरव करण्यात आला .

सत्कारमूर्ती भावना चौधरी यांनी आगामी काळात समुपदेशन संदर्भाने आपण आपल्या शिक्षण संस्थेशी संलग्न राहू असे अभिवचन दिले. तर कोल्हापूरसह मुंबईत वेळोवेळी मदत करण्यास तत्पर असल्याचे डॉ. प्रमीला जरग यांनी सांगितले .

शहीद महाविद्यालयांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातील 90 गावांमधील 600 वर विद्यार्थिंनी शिक्षण घेत असून येथे पारंपारिक शिक्षणाऐवजी आधुनिक व्यावसायिक शिक्षण व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उदाहरणार्थ कॉम्प्युटर एप्लीकेशन, मास मीडिया, डी एम एल टी, कॉम्प्युटर सायन्स, बीएससी मायक्रोबायोलॉजी व फूड अँड न्यूट्रिशन, एमएससी कम्प्युटर सायन्स असे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळेच परीक्षेपूर्वीच विद्यार्थिनींना मोठमोठ्या कंपन्या मधून नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. संस्थेचे शहीद पब्लिक स्कूल गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. त्यामुळे केजीपासून ते पीजीपर्यंत अभ्यासक्रम उपलब्ध असलेले एक अतिशय सुरक्षित व आधुनिक तंत्रज्ञानाने  युक्त असे शैक्षणिक संकुल शहीद परिवाराने तिटवे सारख्या खेडेगावात उभे केले आहे. याचे दीक्षांत समारंभातील मान्यवरांनी कौतुक केले.

या सोहळ्याला आजी माजी विद्यार्थिंनी, हितचिंतक, पालक आणि शैक्षणिक – माध्यम – सांस्कृतिक विश्वातील मान्यवर उपस्थित होते .  सुत्र संचलन दिग्विजय कुंभार व शुभांगी वैद्य यांनी केले . तर आभार डॉ सुधीर कुलकर्णी यांनी मानले.

 

 

Related Articles

Back to top button
??????