ताज्या घडामोडी

१८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत विविध उपक्रम

कोल्हापूर ; राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोक सहभागातून लोकराजा ‘शाहू कृतज्ञता पर्व’ आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने १८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी दिनी (६ मे रोजी) लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूरची जनतेकडून आदरांजली वाहण्यात येईल.

‘कृतज्ञता पर्व’ दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. पोवाडा, संगीत, मर्दानी खेळ, चित्ररथ, व्याख्याने, प्रदर्शन, असे व इतर विविध उपक्रम राज्यभर आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाईल.

राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबा यात्रेनंतर छत्रपती ताराराणी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथोत्सवाची सुरुवात केली होती. याच दिवशी या उपक्रमाला सुरुवात करून सर्व वारसास्थळे आणि इतर वास्तूंची स्वच्छता मोहीम, नाम फलकांचे अनावरण करण्यात येणार आहे.

दिनांक ५ मे रोजी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा, विचारांचा, दृष्टीकोनाचा परिचय करुन देण्यासाठी एकाच वेळी शंभर ठिकाणी शंभर वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानातून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती देऊन त्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जाईल.

दिनांक ६ मे रोजी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

शहरात सकाळी शाहू जन्मस्थळ, नवा राजवाडा, रेल्वे स्टेशन, शाहू मिल, साठमारी, कुस्ती मैदान, बावडेकर आखाडा, गंगावेस तालीम, शिवसागर, रजपूतवाडी व भवानी मंडप येथून कृतज्ञता फेरी काढण्यात येवून ही फेरी शाहू समाधी स्थळ येथे पोहोचेल.

शाहू जन्मस्थळ येथे पुष्पांजली वाहिल्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर श्रद्धांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. या शंभर सेकंद काळात नागरिक जेथे असतील तेथे स्तब्ध थांबून श्रद्धांजली वाहतील.

कृतज्ञता पर्वामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा, आदेश व छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. दर तीन महिन्यांनी मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले जाणार आहे.

या उपक्रमा दरम्यान राजर्षी शाहू महाराजांनी आश्रय दिलेल्या मल्लांच्या कुटुंबियांचा स्नेह मेळावा, सामुदायिक आंतरजातीय विवाह, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

दिनांक १ मे ते ५ मे दरम्यान कोल्हापूर ते खेतवाडी, मुंबई अशा समता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून राज्यात व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

गजरी मध्ये कोल्हापुरी दागिने,

चप्पल लाईन मध्ये कोल्हापुरी चपला,

कुंभार गल्लीत मातीच्या वस्तू,

बुरुड गल्लीत बांबू पासून तयार करण्यात आलेल्या वस्तू,

लक्ष्मीपूरी मध्ये मिरची मसाला,

मार्केट यार्ड मध्ये गूळ आणि तांदूळ,

कोल्हापुरी पदार्थांचा खाद्य महोत्सव,

कॉटन कापड अशी महाराजांनी प्रोत्साहन दिलेल्या व्यावसायिकांकडून कृतज्ञतेने पर्यटक व स्थानिक लोकांना दर्जेदार व योग्य किंमतीमध्ये उपलब्ध करुन देवून आदरांजली वाहिली जाईल.

विद्यार्थ्यांसाठी चित्र, निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, वक्तृत्व, किल्ला निर्मिती प्रमाणेच शाहू कालीन वास्तूची प्रतिकृती निर्मिती आदी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

याचबरोबर शंभर चित्रकार एकाच ठिकाणी एकाच वेळी आपली कला सादर करतील. तर नाटक, शाहिरी, संगीत नाटक, मर्दानी खेळ, कुस्ती मैदान आदी कार्यक्रम आयोजित करून कलेला राजाश्रय देणाऱ्या राजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतील.

उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले होते. यासाठी कृतज्ञतापूर्वक स्टार्ट अप समिट आयोजित होईल.

या सर्व उपक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी ही विविध संस्था, संघटना, मंडळे यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारुन लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले.

Related Articles

Back to top button
??????