ताज्या घडामोडी

हर घर झेंडा उपक्रमासाठी औद्योगिक संस्थांनी सढळ हाताने मदत करावी -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा

कोल्हापूर  : जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्वानिमित्त हर घर झेंडा हा उपक्रम दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील प्रत्येक औद्योगिक आस्थापनांनी उपरोक्त कालावधीत राष्ट्रध्वज लावावेत.

या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर, शासकीय व निम शासकीय कार्यालयावर व सर्व खाजगी आस्थापना वर राष्ट्रध्वज लावला जाणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वजांची आवश्यकता असून औद्योगिक संस्थांनी सढळ हाताने प्रशासनाला राष्ट्रध्वज उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राची आढावा बैठक लक्ष्मी को ऑप इंडस्ट्रीज इस्टेट, हातकणंगले येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एम.डी. शेळके, हातकणंगलेच्या तहसलिदार कल्पना ढवळे, एमआयडीसीचे प्राधिकरण अधिकारी राहुल भिंगारे, जिल्हा अग्रणी प्रबंधक गणेश गोडसे यांच्यासह विविध औद्योगिक संस्थेचे पदाधिकारी, उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी . रेखावार म्हणाले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील काही अंतर्गत रस्ते झाले नसून त्याचा पूर्ण रक्कमेचा प्रस्ताव सादर करावा. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील प्रवेशद्वाराजवळ कोणतेही अतिक्रमण होऊ नये याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना संबंधितांना केल्या. कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये टाकत असलेला घनकचरा बचत गटास देण्यात यावा व ओल्या कचऱ्याचे कंपोस्टींग करावे. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये केएमटी मार्ग वाढविण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

गोकुळ शिरगांव ते पंचतारांकित औद्योगिक वसाहत 500 मीटर रस्ता जोडण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सांगण्यात आले. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर नवीन भूसंपादनाचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  रेखावार यांनी केल्या.

सर्व उद्योजकांनी पोलीसाची आवश्यकता भासल्यास 112 या योजनेचा लाभ घ्यावा. औद्योगिक संस्थेचे हद्दतील सर्व ग्रामपंचातींनी 6 ऑगस्ट रोजी औद्योगिक संस्थेचा कर कमी करण्याबाबत कँम्प आयोजित करावा. प्रत्येक औद्योगिक संस्थेमध्ये ग्रामपंचायतीने घंटागाडी फिरवावी अशाही सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या.

जिल्ह्यात 75 हजार झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. प्रत्येक औद्योगिक संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रात जास्ती जास्त झाडे लावावीत. प्रत्येक औद्योगिक संस्थेने एक एक दिवस ठरवावा व त्या दिवशी मी स्वत: येवून झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जाईल. जेवढी झाडे आवश्यक आहेत ती उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एम.डी. शेळके यांनी जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गगत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच औद्योगिक संस्थांनी व उपस्थित उद्योजकांनी औद्योगििक वसाहतीत येत असलेल्या अडचणी विषयी बैठकीत माहिती दिली.

हर घर झेंडा उपक्रम अंतर्गत प्रत्येक औद्योगिक संस्था राष्ट्रध्वज लावणार आहे तसेच यासाठी प्रशासनाला सढळ हाताने मदत करेल व वृक्ष लागवड औद्योगिक संस्था मोठ्या प्रमाणात करण्यात येईल, असेही उद्योजकांनी बैठकीत सांगितले. शेवटी महाव्यवस्थापक शेळके यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
??????